गुणगुणणे आईचे
माझी आई गुणगुणत असे सतत
वेगवेगळ्या वेळी विविध गीतं
श्लोक व हिंदी मराठी चित्रपट गीतं
अनेक दुर्लभ अर्थपूर्ण सुभाषितं .
भूपाळीने होई दिवसाची सुरवात
घनश्याम सुंदराची लकेर गात गात
नंतर गुंजे थंडगार वात सुटत
शरीर मग्न कामांच्या भाऊगर्दीत.
अर्चनाच्या सुरांसोबत लागे सूर
काम चालू राही कुठेतरी खूप दूर
मधूनच धरून ताल एखाद्या ताटावर
मधुर मस्त लकेर गुंजत राही घरभर .
म्हणे कभी कभी मेरे दिलमें खयाल आता है
तर मध्येच अभी अभी दिन था अभी अभी रात है
नवीन जुन्या दोन्हींची बेमालूम सरमिसळ होई
गायिका व आम्हाला पण ऐकण्याची मजा येई.
आता फक्त त्या गाण्यांची आठवण उरली
सुरेल लकेर व गायिका काळप्रवाहात विरली .
कुठून तरी अजीब दास्तान है कानांवर आलें
भावना, मन व अश्रुंचे बांध संपूर्ण ढासळले.
आठवणींचे गाठोडे अवचित उघडल्या गेले
सूर-लकेरांचे मज आज मर्म उमजले
सुख दुःखाचे, असह्यतेचे घोट पचविले
संगीत साधनेने उत्स्फूर्त स्व:विरेचन केले.
मी ही आजकाल गुणगुणायला शिकले
सहजतेने मनावर नियंत्रण ठेवू लागले
राग ,क्रोध, निराशा व दुःख दूरवर पळाले
आईच्या गाण्यांनी जीवनगीत शिकविले.
वंदना पाठक