Friday, 10 June 2016

महती चिटोऱ्याची  

गांधीजीनी केला योग्य वापर कागदाचा 
उपयोग केला व्यवस्थित साध्या  चिटोऱ्याचा.   

मी ही नकळत ती छान सवय  स्वीकारली 
कागदांच्या चिटोऱ्यावर काहीतरी लिहू   लागली. 

मी हे असे अनेक खरडलेले चिटोरे  जपलेत 
जीवाच्या पलीकडे वहीपुस्तकात  सांभाळलेत . 

लिफाफ्याची कोरी बाजू असो वा असो पत्रिका 
त्यांच्यावर कोरल्या गेल्या सुप्त इच्छा आकांक्षा. 

त्यांच्यातच सापडतील माझे सर्व अक्षांश रेखांश 
कुठेतरी लिहिले असतील आयुष्याचे मर्म व   सारांश. 

कधीकाळी केली असेल  नाना हिशोबाची मांडण 
कागदाच्या तुकड्यावरच केले रांगोळीचे चित्रण . 

आवडणाऱ्या पंक्ती असो  वा पाककृती आईची
यादी त्यात   भावलेल्या पुस्तकांची व विचारधनाची. 

मनन, टिपण, चिंतन, लेखन, वाचन, संभाषण
सर्वांचे विषयवार तपशीलवार यातच विवेचन. 

सांभाळून ठेवलेत ते चिटोरे जीवाच्या पलीकडे    
टाचून जतन करून ठेवलेत पानांमध्ये इकडेतिकडे. 

कधीकाळी अवचित ते चिटोरे दृष्टीस पडतात    
हरवलेला खजिना मिळाल्याचा आनंद देतात. 

तसा काही दडला नाही त्यांच्यात खजिना फार मोठा 
पण छोटे छोटे क्षणच  फोडतात मनातील दुखाला वाटा.  

जीवनाचे अंकगणित व भूमिती दडली त्यांच्यात 
म्हणूनच दडवून ठेवले आहे मी अनेक चिटोरे संग्रहात. 

वंदना पाठक 





       

No comments:

Post a Comment