Thursday, 13 August 2015

 

आज मला असे वाटतंय 

      आज मला असे वाटतंय -

     गवताच्या पात्यासारखे आनंदाने डोलावे 

    उमलणाऱ्या कळीसारखे हळूच लाजावे 

   टवटवीत गुलाबासारखे धुंदीत हसावे 

  भिरभिरणाऱ्या फुलपाखरासारखे बागडावे 

  इवल्या चिमण्यांसारखे चिवचिव करावे 

 आम्रवृक्षावर झुलत कोकिळेसारखे गावे 

 वसंत ऋतूत निसर्गात रमून जावे. 

  आज मला असे वाटतंय -

 बकुळीच्या फुलासारखे शुभ्र फुलावे 

मोगऱ्याच्या गंधासारखे धुंद दरवळावे 

कृष्णकमळासारखे नाजूक हेलकावे घ्यावे 

इवल्याशा जांभळ्या केन्यासारखे अलगद लपावे 

दवाच्या टपोऱ्या थेंबासारखे रंग झळकवावे 

निंबोणीसारखे कुठेही सहज मजेत रुजावे 

डेरेदार वटवृक्षासारखे पाराम्ब्यांसह जगावे . 

आज मला असे वाटतंय -   

बाल्यांच्या जगात मी मनसोक्त रमावे 

वृद्धांच्या असहायतेला अलगद झेलावे 

चंचल निर्झरासारखे अवखळ वहावे 

छोट्या मास्यांसारखे मुक्त विहरावे 

रातराणीसारखे दृष्टीस न पडता बहरावे 

प्राजक्तासारखे  गालीचा होवून मोहित करावे.   

आज मला असे वाटतंय -   

प्रकृतीकडून  बरेच काही अनायास शिकावे 

स्वार्थीपणाचे, ढोंगीपणाचे मुखवटे टाकून द्यावे 

कमळासारखे भुंग्याला अलवार कवेत घ्यावे 

वृक्षांसारखी सर्वांना शांत सुखद सावली  द्यावे  

इंद्रधनुसमान सर्वांना  हर्षाने मंत्रमुग्ध करावे  

आणि बरसणाऱ्या मेघाप्रमाणे तृषार्थाना शमवावे . 

वंदना पाठक 

  

No comments:

Post a Comment