Wednesday, 25 March 2015


वादळी जीवन की जीवन वादळ 
ढगाळलेले आकाश काळवंडले   क्षणात ,
आणि सोसाट्याच्या वाऱ्यासोबत
सुरु झाला गारांचा वर्षाव वेगात
कोसळून पडल्या फांद्या जोरात।

लहान मोठ्या पडत होत्या गारा
पशु पक्षी कोणालाही नव्हता थारा 
भयानक होता तो  निसर्गाचा नजारा
पाहून जीव झाला होता कावरबावरा।

ळत होते लोग  रस्त्यावर सैरावैरा  
केविलावणे होऊन शोधत होते आसरा 
देखूनिया निसर्गाचा रूद्र चेहरामोहरा 
हतबल झाला मनुष्य -प्राणी  बिचारा।   

 निमिषातच मग  शुभ्र नभ खुलले
सूर्यदेव ही आनंदून   हसु लागले
इंद्रधनुष्यी तोरण मोहक सजले
पक्षी किलबिल बागडु लागले.

जीवनात जर हे आक्रीत घडले 
जादुच्या छडीने सर्व काळे ढग हटले 
निसर्गाकडून जन थोड़ेबहुत शिकले 
झाले गेले ते सर्व वादळ विसरले,  

जीवनी इन्द्रधनुष्य मग झगमगू लागले 
दुःखीकष्टी चेहरे आनंदे हसू लागले 
सृष्टीचा  हा  कठिण  पाठ समजले 
प्रकाशाने आयुष्य उजळून, मोहरून  गेले। 
वंदना पाठक 


    

Friday, 20 March 2015


ते  पिवळेजर्द फूल

निवडुंगाच्या काटेरी झाडावर उमलले
सुंदर  पिवळेजर्द फूल
 तीक्ष्ण काट्यांनी वेढलेले
 ते मनाला घालते भूल

खडकाळ जमिनीत रुजलेले
जणू उपेक्षित गरीब मुल
हिरव्या रंगात सजलेले
दर्शविते जिजीविषेची चाहूल

मानवी जीवनाचे आगळे वेगळे
गुपित मज ला त्यात उमगले
खडतर परिस्थितीत लढले जगले
तरीही ते हसले, खुलले,  फुलले

ते निवडुंगाचे पिवळेजर्द फूल
मम मनाला घालते भूल 

Wednesday, 11 March 2015


बकुळ गंध 
शाळेतील आठवणीनां  दिला  होता पूर्णविराम
काही होत्या ठळक तर काहींना ठोकला होता सलाम  
काही खुणावत होते चेहेरे  हसत डोळे मिचकावत ढगाआडून
 काही विरुन गेले होते अस्पष्ट होत धुक्यामधून 
तरी बकुळ गंध स्मृतिंचा दरवळत होता आसपास 
मनाला ताजगी देत निरभ्र  करत होता तो विनासयास  
डोकावणारे चेहेरे  समोर येत कधी कधी बाजाराहाटात 
परंतु नाव आणि चेहऱ्यांची सोडवता नव्हती   येत  नीरगाठ। 

   अचानक आला शाळकरींना भेटण्याचा प्रस्ताव  एक दिनी 
   सर्व मित्रमैत्रिणींच्या पुनर्मिलनाचा  ठरवला होता बेत कोणी 
   सर्व आठवणीनां अचानक फुटले हिरवेकंच  कोवळे धुमारे 
   नजरेसमोर यायला लागले भूतकालातील दिवस साजरे  
  पुस्तकात सांभाळून ठेवलेल्या बकुळ सुमनांप्रमाणे 
  मनाला स्पर्श करून अलगद गोंजारणाऱ्या मोरपिसाप्रमाणे 
  झंकारून माझ्या तनमनाला एक एक चेहरा सामोरे आला 
  ई मेलच्या माध्यमातून  बकुळ गंध  परत दरवळून  गेला।  

पुनर्मिलनाने जादूची छड़ी फिरली, मनाला नवीन उभारी मिळाली 
व्हाट'स ऍप ने भावविश्वे फुलली , शुभ्र नवी   रम्य दालने  खुलली   
फेसबुकने घडवली कमाल, त्यात डी व्हीडी व छायाचित्रांची धमाल  
निर्मल मैत्रीचे भावबंध  गुंफले,  'पचपनचे  बचपन' पुनश्च सुरु जाहले। 
नृत्य वादन गायन साथ साथ , बालपणीचे खेळ रंगले घेवुनी हातात हात
रंगु लागले चर्चासत्र , राजकारण,क्रिकेट , साहित्य , नाही एकही विषय वर्ज्य 
वर्धु दे , फुलू  दे, खुलु दे,   गंधित होवू दे हे आमुचे प्रेमबंध निर्व्याज। 
वंदना पाठक 
,