बकुळ गंध
शाळेतील आठवणीनां दिला होता पूर्णविराम
काही होत्या ठळक तर काहींना ठोकला होता सलाम
काही खुणावत होते चेहेरे हसत डोळे मिचकावत ढगाआडून
काही विरुन गेले होते अस्पष्ट होत धुक्यामधून
तरी बकुळ गंध स्मृतिंचा दरवळत होता आसपास
मनाला ताजगी देत निरभ्र करत होता तो विनासयास
डोकावणारे चेहेरे समोर येत कधी कधी बाजाराहाटात
परंतु नाव आणि चेहऱ्यांची सोडवता नव्हती येत नीरगाठ।
अचानक आला शाळकरींना भेटण्याचा प्रस्ताव एक दिनी
सर्व मित्रमैत्रिणींच्या पुनर्मिलनाचा ठरवला होता बेत कोणी
सर्व आठवणीनां अचानक फुटले हिरवेकंच कोवळे धुमारे
नजरेसमोर यायला लागले भूतकालातील दिवस साजरे
पुस्तकात सांभाळून ठेवलेल्या बकुळ सुमनांप्रमाणे
मनाला स्पर्श करून अलगद गोंजारणाऱ्या मोरपिसाप्रमाणे
झंकारून माझ्या तनमनाला एक एक चेहरा सामोरे आला
ई मेलच्या माध्यमातून बकुळ गंध परत दरवळून गेला।
पुनर्मिलनाने जादूची छड़ी फिरली, मनाला नवीन उभारी मिळाली
व्हाट'स ऍप ने भावविश्वे फुलली , शुभ्र नवी रम्य दालने खुलली
फेसबुकने घडवली कमाल, त्यात डी व्हीडी व छायाचित्रांची धमाल
निर्मल मैत्रीचे भावबंध गुंफले, 'पचपनचे बचपन' पुनश्च सुरु जाहले।
नृत्य वादन गायन साथ साथ , बालपणीचे खेळ रंगले घेवुनी हातात हात
रंगु लागले चर्चासत्र , राजकारण,क्रिकेट , साहित्य , नाही एकही विषय वर्ज्य
वर्धु दे , फुलू दे, खुलु दे, गंधित होवू दे हे आमुचे प्रेमबंध निर्व्याज।
वंदना पाठक
,
No comments:
Post a Comment