काठी
रोज फिरते तशी, त्या एका दिवशी
संध्याकाळी बसले होते बागेत जराशी
शेजारीच बसला होता समुह आजींचा
प्राणायाम, रामरक्षा व म्हणत होत्या परवचा.
काही वेळाने एक आजी अस्वस्थ झाल्या
बसल्या जागेवर उगीचच वळवळू लागल्या
निमिषातचं मग त्या उभ्या जाहल्या
घरी परतते असे वारंवार म्हणू लागल्या.
"का ग सखे कसली घाई, जा काही वेळाने बाई",
"रात्रीचं मला दिसत नाही, यास्तव करते घाई
आज काठी आणायचे विसरले मी कशीच
धडपडून हातपाय तोडून घ्यायची मीच."
मिश्किलपणे एक आजी हसल्या व वदल्या ,
"काठीची गरज कशाला भासते ग तुजला ?
थांब थोडावेळ तुझी काठी येईल तुला शोधत,
त्यांना पण हवीशी आहे ना तुझी सोबत."
"म्हातारपणी सर्वांनाच जरुरी काठीचा आधार,
कारणे वेगळी प्रत्येकाची, वयाचाच होतो भार.
कान, दात, दृष्टी कमजोर, थरथरतात हातपाय,
त्यांना तुझी काळजी, आल्याशिवाय राहतील काय? "
" खरे आहे प्रत्येकाला जरुरी काठीचा आधार,
परंतु आमच्या बाबतीत सूत्रं बदलले थोडेफार ,
ज्यांनी केली माझी सोबत दररोजअनेक वर्ष ,
त्यांची काठी झाली आहे मी गेले काही दिन सहर्ष."
"सोडून त्यांना मंदिरात, येते मी रोज येथे बागेत ,
तेथे मित्रांसोबत राहतात ते काही काळ मजेत.
जाताना मी त्यांना हात देऊन सोबत नेते घरी,
मी झाले काठी त्यांची , हीच या नात्यातील गमंत खरी."
वंदना पाठक
No comments:
Post a Comment