माझी गाथा
मी पडते
उठते
सावरते
धडपडते
धडपडताना
मी घडते.
मी घरी
लहानशी परी
लेक साजरी
सर्वांची दुलारी
मोदाच्या सरी
दुनियाच न्यारी .
सरले बालपण
तारुण्यात पदार्पण
नवनवीन आकर्षण
विचारांचे संप्रेक्षण
बंधनांचे कुंपण
सखा फक्त दर्पण.
सरलेत वर्ष
शिक्षणाचा हर्ष
प्रेमाचा स्पर्श
मोरपिसाचा स्पर्श
घरी विचारविमर्श
नात्यांचा संघर्ष.
एक सर्ग नूतन
हवेहवेसे बंधन
नात्यांची गुंफण
सुखांची पखरण
बाळाचे आगमन
सुखद जीवन.
कमळातील भ्रमर
करी हळूच जर्जर
आजाराचा वावर
सुरु झाली घरघर
भविष्य दुर्धर
हसू मात्र निर्झर.
समोर भीषण छाया
सोडवत नव्हती माया
हात सुटले, कंपित काया,
अस्तित्वाची जाणीव द्याया
दोन टोकांची गाठ घालाया
धडपडले मी, नको फुकाची दया.
मी पडले,उठले,
सावरले, धडपडले,
प्रयत्नांचे सार्थक केले
धडपडताना मी घडले.
मी घडता घडता घडले
व इतरांनाही घडविले.
वंदना पाठक
No comments:
Post a Comment