Tuesday, 26 May 2015



माझे नागपूर 

हरवली आहे माझी आवडती एक न्यारी व्यक्ती
माझ्या रोमरोमात वसते तिची  तीच आकृती.
पुरातन वारसा ल्यायलेली तिची अनोखी संस्कृती
सर्वांना एकत्र घेऊन नांदण्याची होती तिची वृत्ती.

तीनशे वर्षांचा अदभूत  अपूर्व इतिहास लाभलेली
कलागुणांच्या वारस्याने अमुलाग्र  ती नटलेली
तमाशा, जलसा, कुस्ती,  नृत्य, संगीत व मंत्र
सर्वांना आपलेसे करायचे अवगत होते तंत्र .

टेकडीचा गणपती, राजाबक्षा व  ताजबाग 
लाकडीपूल, चितार ओळ आणि केळीबाग
मोमिनपुरा, इतवारी, सीताबर्डी, सदर  भाग
अतिक्रमणाने व्यापली  दुकानांची रांग. 

अनोख्या  संस्कृतीने नटले आमचे नागपूर
काळी,  पिवळी मारबत,  शोभायात्रा  भरपूर
दिक्षाभूमी, किल्ला, तलाव, बगीचे,हिरवळ सर्वदूर 
ह्या संस्कृतीचा वारसा टिकेल का हीच  हुरहूर.  

हरवले आहे माझ्या मनातील नागपूर
लहानपणापासून हळूच होत होते दूर.
गांधींची उचलबांगडी जाहली एका कोपऱ्यात
व्हेरायटीची जागा  सिनेमेक्सने घेतली थाटात .

धनवटे रंगमंदीर व राणी झांशीचा पुतळा
सीताबर्डीची शान होता आगळा वेगळा
त्याच्या शेजारीच वसली होती संगम चाळ
मागे नदीकाठी जणू रचलेली मंदिरांची माळ .

बर्डीचे आता अमुलाग्र रूप स्वरूप  बदलले
भर रस्त्यावरून चालणे कठीण झाले
दुकानांची दुतर्फा  गर्दी झाली दाटीवाटीने
परिचित गायब होऊन आली नवीन स्थाने.

सर्वदूर झालेत मोट्ठे मोट्ठे उडानपूल  सुंदर
त्यावरील दिवे रात्रीचा पाडतात विसर.
दिवसरात्र अहर्निश  धाव धावते हे शहर
आता मेट्रो रेल त्यात पाडणार अजून  भर.

मिहानने फिरवली  जणू  छडी जादूची 
कमाल  व हद्द झाली तेथे कायापालटाची 
भर पडली अनेक नूतन उद्योग धंद्यांची 
पण वाट लागली त्यात कापड गिरण्यांची.  

उड्डाण पुलांनी  शहरात कमालच केली 
वेळेची व वेगाची गणिते बदलूनच गेली 
संत्रानगरी भारताचा  केंद्रबिंदू जाहली 
नागांची वसाहत  बहरली, फुलली, विकसली.  

परिवर्तन अपरिहार्य  ही काळाची वर्दी 
सुकते, प्रदूषित होते, तरीही  वाहते नागनदी 
संस्कृतीची सरमिसळ, लोकांची भाऊगर्दी 
मायमराठी आमुची नव्या-जुन्याची दर्दी .  

माझ्या नागपूरचा मला सार्थ अभिमान 
हीच कर्मभूमीच आहे माझे जन्मस्थान 
जुन्यानव्याची गुंफण ही  संस्कृतीची   खाण   
हरवलेल्या व्यक्तीला शोधायचे स्वीकारले वाण. 

वंदना पाठक  








No comments:

Post a Comment