Wednesday, 29 April 2015



                                                                    मैत्रीचे लोणचे 
आपली मैत्री
मुरलेले लोणचं!
मनात येइल तेव्हा
कसंही चाखायचं.


लहान फोड , मोठी फोड ,
अख्खं किंवा केले  किसून .
त्याच्या चवीला नाही तोड,
सर्व  ऋतुत जाते मन जिंकून.   

लोणच्याचे आहे विविध प्रकार  ,
बरण्यांचे  ही वेधक रेखीव आकार.
स्वाद  नाना आंबट, गोड, तिखट,
खाताना होतात सर्वंच हावरट.

मिरचीचे लोणचे तिखट जहाल
जास्त खाल्यास होतात हाल.
दुरूनच  हालहवाल विचारावा,
लिंबाचा आधार अशावेळी घ्यावा.

कैरीचे लोणचे मस्त  चटकदार
कोणत्याही प्रसंगी आणते बहार.
मुरलेल्या लोणच्याची लज्जत न्यारी,
दिवसेंदिवस वाढते त्याची खुमारी.

मुरलेल्या मैत्रीत  चव लोणच्याची
कैरी, आवळा, लिंबू,  किंवा मिरची.
आवडेल त्याचा  मनसोक्त स्वाद घ्यावा,
प्रसंगानुरूप लोणच्याचा प्रकार बदलवावा.

आमची मैत्री मुरलेले लोणचं मस्त
सर्वच आवडीने करतात  मजेत फस्त.
मसाल्याचे स्वरूप बदलते थोडेफार
चाखण्यास चव आम्ही सदा तयार .


त्याच्या आठवणीनेच भूक लागते 
कोणत्याही प्रसंगाची लज्जत वाढते.  
 नुसत्या  सयीनेच मन ललचावते 
प्रत्यक्ष मिळाल्यास, अहाहा , मन खुलते. 

मी आहे खरेच  किती  बरे भाग्यवान 
मनाचा कल बदलणारे मित्र मिळाले छान. 
आमच्या मैत्रीचे लोणचे चटकदार
खूप मुरल्याने आता झालंय जास्त  मजेदार. 

वंदना पाठक  



     


Sunday, 19 April 2015



सदाफुली 

 भर चौकात बागडत राहते ती 
जणु अवखळ, चंचल, छोटेसे फुलपाखरू. 
सावळी, कृश , टपोऱ्या डोळ्यांची ती,
आहे एक गोड इवलेसे लेकरू. 

सतत अनवाणी, विस्कटलेले केस,
लक्तरे झालेला, जुना पुराणा वेश. 
कोणताही ऋतु असो खेळते  सतत   
चिंध्यांचा चेंडू, तुटकी गाडी, बाहुली हसत. 

आपुल्या मुलांचे विश्व अनभिज्ञ तिला 
शाळा, पुस्तके, विडीओ गेम्स व इतर लीला. 
शिळे पाके अन्न, कोरडी भाकरी हा आहार 
केला नाही कधीही बिस्किट, चॉकोलेट  वा फलाहार. 

आडोशाला कापड बांधून उभारलेले घर 
सर्वदूर पसरलेले रस्ते आहे तिचे वावर. 
आई दिसायची सोबत, वडिलांचा नव्हता पत्ता 
सतत आनंदी राहायचा गिरविला जणू कित्ता. 

नव्हती गरज हिवाळ्यातही उबदार कपड्यांची 
उन्हाळ्यातही फुटपाथवर गादीसारखे झोपायची. 
गालावर पडायची तिच्या खळी सुंदर एक 
तिच्या बालरूपाचे कौतुक करत अनेक. 

रस्त्यावर नजर येणारे आकर्षक छोटे फूल 
परिस्थितीची, गरिबीची, जगाची, काहीच नाही चाहूल . 
कुठेही, कशीही, केव्हाही, कधीही सदाफुलीच उगवते 
कठिण  परिस्थितीतही तीच तग धरते , जगते.         

वंदना पाठक 
     

Thursday, 16 April 2015



गर्भ 

मनात दडली आहेत माझ्या अनेक बीज कवितांची 
शब्द अपूरे  पडतील करायला व्यक्त  रूपे स्पंदनांची. 
अनेक कथानक घोंगावत आहेत माझिया मनात 
कागदांची भेंडोळी असमर्थ आहे  दर्शवायला प्रतिमा त्यात. 
प्रत्येकाच्या मनात उठते का असेच झंझावाती वादळ  
त्यांच्या हृदयालाही  कासावीस करते  का ही  जीवघेणी कळ ?
कागद लेखणी धरता हाती, शब्द सुचती झरझर झरझर 
भावनांचा धबधबा कोसळतो  अविरत मग खूप भरभर.  
या शब्दरूपी भावनांना कसा व कोणी बांध घालावा, 
दुसऱ्यांना उमगेल का माझ्या अस्वस्थतेचा खोलावा?   
मनाला संभ्रमित करतो हा भावनांचा असह्य कल्लोळ,
त्यातूनच स्फुरत जाते कवितेची ओळ आणि  ओळ . 
शब्दांना मग पाझर फुटतो, तुडुंब भरते मन जलाशय 
अर्थपूर्ण शब्दांनी साकार होतो सघन, सुंदर, समृध्द आशय. 
ही कविता प्रतीक त्याचे, शब्दांनी साकार मानस सरोवर,
मनातील बीजाला फुटलेले इवले इवले  कोवळे अंकुर. 
वादळ शमले, निरभ्र झाले क्षणातच विशाल मन गगन शुभ्र ,  
गोंडस रूप धारण करुनी प्रकट जाहला  माझा चिमुकला  गर्भ. 
वंदना पाठक  





    




Friday, 10 April 2015



हॅम्लेट : नायक नवा 
आहे तसा दडलेला 
एक  हॅम्लेट प्रत्येकात 
करावे किंवा नाही या संभ्रमात. 
हा हॅम्लेट डोकं   काढतो  वर कधीही 
आणि जगणे अश्यक्य करतो क्षणातही. 
मनाची अवस्था असते  दोलायमान
कोणावर विश्वास ठेवावा नसते भान. 
नाते, संबंध, मित्र -दोस्त सर्वच जण  
कोण आपले वा परके, समोर ठाकले प्रश्न. 
सद्सद्विवेक बुद्धी टाकून जणू गहाण  
भीत भीत जगतो ठेवून मूठीत प्राण. 
दिवस महिने वर्षानुवर्षं चालते कालचक्र
निराशा मनात बाळगून दृष्टी करतो वक्र. 
जीवन मंचावर नकोत हॅम्लेट वा ऑफेलिया
काळोखाची नको कोणाही जीवावर छाया. 
नको आत्ममग्न, अनिश्चयी, अनिर्यणी युवा 
माणसाचा मनावर संपूर्ण ताबा जरूर  हवा.    
मनातील हॅम्लेटने करायला हवे पलायन 
प्रत्येकाला त्यासाठी शोधावे लागेल रसायन. 
मानसिक शांती, समाधान, प्रेम व मोकळेपणा
घडवू शकेल हमखास हॅम्लेट सकारात्मक   देखणा. 
नवीन ठाम कर्तृत्ववान  हॅम्लेट घडवायलाच हवा 
जुना नायक अवतरेल घेउनी गुणांचा साज नवा.  

   वंदना पाठक 
  



Wednesday, 8 April 2015




शेक्सपियर समजताना 

शेक्सपियर   चे विराट रूप स्वरूप  जाणवले आज
उत्तुंग शिखराचा ज्यांना लाभला अपूर्व साज
अनेक वर्षांपासून  सुरु होते  त्यांच्या अभ्यासाचे  काज
 तरीही त्यांच्या पायथ्याशी उभे राहण्याची वाटते लाज

अथांग वादळी सागरात जशी   डगमागते  एखादी नौका
प्रत्येक मोठ्या लाटेनंतर चुकतो काळजाचा  एकेक ठोका
स्थिरस्थावर होऊन पुढे जाण्याचा पत्करते मोठा धोका
तसाच अनुभव आला शेक्सपियर  अध्ययनाचा अनोखा

मुसळधार पावसात  चिमणा जीव शहारतो  भिजून
हळूच शोधतो उबेचा आसरा खिडकीतून डोकावून
पुस्तंकांच्या ढिगाऱ्यात किंवा आड बसतो दडून
कुठे ,काय, कसे, केव्हा मिळेल पाहतो चाचपडून  

तशीच थोडी फार  झाली होती माझी  दयनीय गत
अनेक स्त्रोतांमध्ये माझे मन होते पूर्ण रमत
 नाटके शोकान्तिका, सुखान्तिका, ऐतिहासिक व सुनीत
विविध समीक्षकांची नवनवीन मतांतरे आणि मत

मनामध्ये भ्रमांची व प्रश्नांची कोळीष्टके जमली
काय स्वीकारावे वा नाकारावे मती भ्रष्ट  झाली    
मग अचानक आंधळे व हत्तीची  कथा आठवली
संपूर्ण नाही पण थोडी बहुत शेक्सपियर गाथा उमगली

शेक्सपियरचे  संपूर्ण आकलन होणेच अश्यक्य
जेव्हढे पचनी पडेल  तेच ग्रहण करावे यावर मतैक्य
 मान लवून त्यांच्या अफाट उंचीचे दर्शनच संभाव मात्र 
म्हणूनच त्यांचे गुणगान  भूलोकी यत्र तत्र सर्वत्र .
 वंदना पाठक