सदाफुली
भर चौकात बागडत राहते ती
जणु अवखळ, चंचल, छोटेसे फुलपाखरू.
सावळी, कृश , टपोऱ्या डोळ्यांची ती,
आहे एक गोड इवलेसे लेकरू.
सतत अनवाणी, विस्कटलेले केस,
लक्तरे झालेला, जुना पुराणा वेश.
कोणताही ऋतु असो खेळते सतत
चिंध्यांचा चेंडू, तुटकी गाडी, बाहुली हसत.
आपुल्या मुलांचे विश्व अनभिज्ञ तिला
शाळा, पुस्तके, विडीओ गेम्स व इतर लीला.
शिळे पाके अन्न, कोरडी भाकरी हा आहार
केला नाही कधीही बिस्किट, चॉकोलेट वा फलाहार.
आडोशाला कापड बांधून उभारलेले घर
सर्वदूर पसरलेले रस्ते आहे तिचे वावर.
आई दिसायची सोबत, वडिलांचा नव्हता पत्ता
सतत आनंदी राहायचा गिरविला जणू कित्ता.
नव्हती गरज हिवाळ्यातही उबदार कपड्यांची
उन्हाळ्यातही फुटपाथवर गादीसारखे झोपायची.
गालावर पडायची तिच्या खळी सुंदर एक
तिच्या बालरूपाचे कौतुक करत अनेक.
रस्त्यावर नजर येणारे आकर्षक छोटे फूल
परिस्थितीची, गरिबीची, जगाची, काहीच नाही चाहूल .
कुठेही, कशीही, केव्हाही, कधीही सदाफुलीच उगवते
कठिण परिस्थितीतही तीच तग धरते , जगते.
वंदना पाठक
No comments:
Post a Comment