Thursday, 16 April 2015



गर्भ 

मनात दडली आहेत माझ्या अनेक बीज कवितांची 
शब्द अपूरे  पडतील करायला व्यक्त  रूपे स्पंदनांची. 
अनेक कथानक घोंगावत आहेत माझिया मनात 
कागदांची भेंडोळी असमर्थ आहे  दर्शवायला प्रतिमा त्यात. 
प्रत्येकाच्या मनात उठते का असेच झंझावाती वादळ  
त्यांच्या हृदयालाही  कासावीस करते  का ही  जीवघेणी कळ ?
कागद लेखणी धरता हाती, शब्द सुचती झरझर झरझर 
भावनांचा धबधबा कोसळतो  अविरत मग खूप भरभर.  
या शब्दरूपी भावनांना कसा व कोणी बांध घालावा, 
दुसऱ्यांना उमगेल का माझ्या अस्वस्थतेचा खोलावा?   
मनाला संभ्रमित करतो हा भावनांचा असह्य कल्लोळ,
त्यातूनच स्फुरत जाते कवितेची ओळ आणि  ओळ . 
शब्दांना मग पाझर फुटतो, तुडुंब भरते मन जलाशय 
अर्थपूर्ण शब्दांनी साकार होतो सघन, सुंदर, समृध्द आशय. 
ही कविता प्रतीक त्याचे, शब्दांनी साकार मानस सरोवर,
मनातील बीजाला फुटलेले इवले इवले  कोवळे अंकुर. 
वादळ शमले, निरभ्र झाले क्षणातच विशाल मन गगन शुभ्र ,  
गोंडस रूप धारण करुनी प्रकट जाहला  माझा चिमुकला  गर्भ. 
वंदना पाठक  





    




No comments:

Post a Comment